Sunday, April 22, 2007

सुधारक जालनिशीतली पहिली नोंद

सुधारक जालनिशीतली पहिली नोंद
मुकुंदराज यांनी लिहिलेला 'विवेकसिंधु' हा मराठी भाषेतील पहिला ग्रंथ,त्याला आता अनेक शतके होऊन गेली. १८१७ मधे इंग्रजीतून पहिलं मराठी पुस्तक भाषांतरित केलं गेलं.
त्यानंतर १८३२ मधे बाळशास्त्री जांभेकरांनी 'दर्पण' हे मराठीतलं पहिलं वृत्तपत्र काढलं आणि मराठी भाषेतल्या एका नव्या अध्यायाला प्रारंभ झाला. मराठी वाचकांना जागरूक, बहुश्रुत, प्रगल्भ करण्याचं नि त्यांच्यावर घडत असलेल्या अन्यायाचं आणि वास्तवाचं भान आणून देण्याचं काम वृत्तपत्रे तेव्हापासून आत्तापर्यंत करत आलेली आहेत नि यापुढेही करतील. एवढ्या वर्षांच्या काळात कित्येक वृत्तपत्रं आली,चालली,वाढली आणि काही बंदही पडली.आंतरजालाच्या जमान्यात वृत्तपत्रांच्या ई-आवृत्त्या निघायला लागल्या,काळाप्रमाणे त्यांनाही बदलावं लागलं.वळणावळणाने चाललेला हा प्रवास खरंच आश्चर्यचकित करुन सोडणारा आहे.
आणि आता जालनिशी (ब्लॉग).सर्वसामान्य माणसालाही मनाचं अंतरंग व्यक्त करायला लावणारं एक नवीन माध्यम.इंटरनेटच्या अनेक देणग्यांपैकी एक. इंग्रजी भाषेत आले त्याप्रमाणे अनेक जालनिश्या मराठीतही आल्या.त्यांची संख्याही वाढली.पण इंग्रजी किंवा अगदी हिंदी भाषेत जशा जीवनाच्या सगळ्या बाबींना स्पर्श करणा-या, आजुबाजुच्या विविध घटनांवर भाष्य करणा-या आणि वाचतावाचता विचार करण्यास प्रवृत्त करणा-या जालनिश्या आहेत, तशा जालनिश्यांची मराठीत नक्कीच वानवा आहे. आज ही 'सुधारक' जालनिशी सुरु करताना असंच काही वेगळं करण्याचा आमचा विचार आहे.
कुठल्याही एका खास विषयासाठी ही जालनिशी मर्यादित असणार नसुन, सगळ्याच विषयांना स्पर्श करणारं लिखाण या जालनिशीवर वाचता येईल.वेगळा विचार मांडणारं, नवीन काहीतरी करायला प्रेरणा देणारं,प्रवृत्त करणारं लिखाण द्यायचा आमचा मानस आहे. जगाला दुर्लक्षून आज कुणालाही पुढे जाता येणार नाही मात्र याच वेळी आपल्या शहराला टाळूनही जमणार नाही. एकाचवेळी पुण्यापासून पॅरिसपर्यंत आणि महाराष्टातल्या राजकारणापासून महाजालावर येत असलेल्या तंत्रज्ञानापर्यंत अनेक विषयांवर टिप्पणी करणारी ही जालनिशी असेल, यात तुम्हा वाचकांची साथ मात्र आम्हाला अतिशय महत्वाची वाटते, ती मिळेल ना?

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home