Wednesday, April 25, 2007

वेळ धंद्याची आहे.

वेळ धंद्याची आहे.
पहिल्यापासूनच धंदा या प्रकाराबद्दल मराठीजनांचा दृष्टीकोन नापसंतीदर्शक राहिला आहे,त्याची कारणमीमांसा मी करत नाही.आज परिस्थिती वेगाने बदलत असली तरी अशा मराठीजनांची संख्या वाढायला हवी हे मात्र नक्की.
असो, आजची ही नोंद आहे आजकालच्या धंद्याच्या बदललेल्या परिमाणांचा विचार करण्य़ासाठी.लोकांच्या सुपीक डोक्यातून काय भन्नाट कल्पना निघतील आणि बघताबघता कशाचा धंदा ते सुरु करतील याचा अंदाज करणे खरेच अवघड आहे! जगातल्या वेगाने बदलत असलेल्या परिस्थितीमुळे आणि ते वेगाने जवळ येत असल्याने या संधी निर्माण झाल्या आहेत हे बाकी खरेच.
जास्त पाल्हाळ न लावता तुम्हाला काही उदाहरणंच दिली तर तुमच्या सहज लक्षात येईल.
आंतरजालातलं सेकंड लाईफ नावाचं दुसरं जग तुम्हाला माहित आहे का?असेलंच म्हणा!तर आपल्या या जगासारख्याच सगळ्या गोष्टी आपण तेथेही करु शकतो.या जगातल्या चलनाचं नाव आहे लिंडेन डॉलर. तर एक श्रीमती आपल्या ख-या डॉलरच्या बदल्यात हे चलन या दुसरया जगात विकतात आणि या द्वारे त्यांनी बराच पैसा कमावलाय.दुसरं उदाहरण आहे सिंगापुरमधल्या एका वृध्देचं.सिंगापूर खरेदीसाठी जगप्रसिध्द आहेच मात्र बर्याच जणांना सिंगापूरमध्ये गेल्यावर खरेदी कुठे करावी,कोणत्या वस्तू कुठे चांगल्या मिळतात हे माहित नसतं.अशा भटक्यांना सल्ला पुरवण्याचं काम या वृध्देचं.पण त्यासाठी तुम्हाला मोजावे लागतात तब्बल १०० डॉलर दर तासाला!मात्र सिंगापूरमध्येच राहत असल्याने तिच्याकडून सिंगापूरची खडानखडा माहिती तुम्हाला मिळते.आहे की नाही कमाल?
धंदा करायची अशी एखादी कल्पना सुचली तर अजून काय पाहिजे?नोकरीनंतर निवृत्त होऊन घरी बसलेल्यांनाही फावल्या वेळेत खूप काही करता येईल.नुकतंच पेपरात एका महिलेबद्दल वाचलं की फावल्या वेळेत तिने फुलांच्या सजावटीचा कोर्स केला आणि आता तिने कृत्रिम फुलांच्या रचनांची लायब्ररी सुरु केली आहे.बॅंका,ऑफिसेस इ.ठिकाणच्या फुलांच्या रचना नियमित कालावधीनंतर बदलायच्या आणि नवीन मांडायच्या एवढंच काम.मात्र त्यासाठी अशा एखादी कल्पना स्फुरायला हवी हे महत्त्वाचं!
असा जरा वेगळा विचार तुम्ही कधी करता का? नाहीतरी नोकरी,दैनंदिन जीवन हे तर आहेच की!जरा यातनं बाहेरचा विचार करुन तर बघा.काय सांगावं तुम्हालाही एखादी कल्पना सुचेल! अन मग,आपलं आवडतं काम केल्याचं समाधान नि भरपूर पैसा हे दोन्ही तुमचंच ! काय म्हणता?

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home