Sunday, June 3, 2007

ऍपलचा आयफोन...

ऍपल कंपनीचा आय फोन हा एक विविध ऍप्लिकेशन्सची रेलचेल असलेला आखुड शिंगी आणि बहुदुधी(किंमत कळण्याआधी..)असा मस्त फोन आहे.आजच्या जमान्यात जे जे सर्वकाही जवळ असण्याची अपेक्षा तुम्ही करु शकता ते ते सर्वकाही या फोनमध्ये कोंबून अगदी नीट बसवलंय.कॅमेरा आहे,मल्टिमीडीया आहे,आंतरजाल सक्षमता आहे,बिनतारी माहितीदेवाणघेवाण करण्यासाठी ब्लु-टूथ आहे आणि अर्थातच हा फोन ऍपल कंपनीचा आय-पॉड आणि फोन याची मिश्र प्रजाती असल्याने आय-पॉड पण आहेच.ऍपल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव जॉब्ज यांनी ९ जानेवारी २००७ला Macworld conference & Expo वेळी आय फोनची घोषणा केली,आणि लगेचच प्रसिध्दीमाध्यंमांचं लक्ष वेधून घेतलं. तेव्हापासूनच जगभरात आय फोनची प्रतीक्षा होत आहे.
खरंतर याआधी ऍपल आणि मोटोरोला यांच्या संयुक्त विद्यमाने अशा फोनची निर्मिती करण्यात येणार होती.त्यानुसार दोघांतर्फे ऍपलच्या आयट्युन्स या प्रणालीचा (जिच्या सहाय्याने गाण्यांबाबतची ऐकणे,आवडत्या गाण्यांच्या याद्या तयार करणे,नवीन धून तयार करणे ही आणि इतर बरीच कामं केली जातात) वापर करणारा रॉकर ई-१ हा फोन बाजारपेठेत सादर करण्यात आला होता.मात्र भागीदारी आली की तडजोड आलीच.त्यामुळे स्वत:च्या इच्छेप्रमाणे फोन बनवता येत नसल्याच्या असमाधानातूनच ऍपल कंपनीने सप्टेंबर २००६ मध्ये मोटोरोला कंपनीबरोबरचे आपले संबंध आवरते घेतले,आणि स्वतंत्रपणे फोनची निर्मिती करायचा निर्णय घेउन बाजारपेठेत उडी मारली.
ऍपल फोनची पहिली जाहिरात प्रसिध्द झाली ती ७९व्या ऍकेडमी अवार्डच्या सोहळ्यात.प्रसिध्दीसाठी या सोहळ्याचा धूर्त उपयोग बराच कामी आला,आणि खुद्द जाहिरातही विचित्रच होती!त्यात चक्क वेगवेगळ्या चित्रपट, मालिकांमधल्या हॅलो म्हणणा-या व्यक्तींच्या दृश्यांचा वापर करण्यात आला होता.एकूणच वैविध्य आणि नेहमीपेक्षाचा वेगळेपणा यामुळे नाव सर्वतोमुखी झालं हे नक्की!
वर म्हंटल्याप्रमाणे आय फोनमध्ये लक्ष वेधून घेणा-या ब-याच गोष्टीआहेत.फोनचा कळफलक(keyboard) आभासी(virtual)असून स्वयंचलित शब्द तपासणीची सोय आहे.वापरले जाणारे शब्द पटापट शिकणारा झकास शब्दकोश आहे.फोनचा पडदा(screen)स्पर्शसंवेदी आहे.लिखाणासाठी stylus(स्पर्शसंवेदी फोनमध्ये लिहण्यासाठी दिली जाणारी,पेनासारखं फक्त टोक असणारी लेखणी)ची गरज नसून केवळ बोटानेही पडद्याचा वापर करता येणार आहे.उत्कृष्ट छायाचित्रांसाठी २ मेगापिक्सलचा कॅमेरा असून काढलेले फोटो ई-मेलद्वारे पाठवायची सोय आहे.२००५मध्ये निघालेल्या पाचव्या मालिकेतल्या आय पॉडचा आयफोनमध्ये समावेश करण्यात आला आहे,म्हणजे संगीतशौकिनांसाठी पर्वणीच!हे कमी म्हणून की काय आंतरजाल सक्षमतेसाठी वाय-फाय यंत्रणा आहेच.बिनतारी माहिती दळणवळणासाठी २.० क्षमतेचे ब्ल्यू-टूथआहे.आता एवढं सगळं चालवायचं म्हणजे तगडी बॅटरी हवीच!पण त्याची काळजी तुम्ही करायचं कारण नाही.केवळ गाणी ऐकण्यासाठीची बॅटरीची क्षमता १६ तासांची असून चलतचित्रण बघण्यासाठी किंवा फोनवर बोलण्यासाठी ही क्षमता ५ तासांची आहे.
असा हा आयफोन हवा असल्यास त्यासाठी थोडी प्रतीक्षा मात्र करावी लागेल.ठरलेल्या कार्यक्रमानुसार आय फोन प्रथम अमेरिकेत जून २००७ मध्ये उपलब्ध होईल.त्यानंतर तो युरोप आणि जपानमध्ये टप्प्याटप्प्याने वितरीत करण्यात येईल.आशियात मात्र आयफोन उपलब्ध होईल तो थेट २००८ सालात!तेव्हा थोडी कळ सोसणं आलंच!
अरेच्या!पण आपल्या सर्वांच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा असा एक मुद्दा राहिलाच की!आणि तो म्हणजे किंमतीचा!कसं आहे,फोन असू द्यात हो कितीही आकर्षक!शेवटी दामाजीपंत आहेत तरच सगळं काही आहे. आयफोन घ्यायचा तर त्यात दोन पर्याय आहेत.चार गिगाबाईट क्षमतेच्या आयफोनसाठी मोजावे लागणार आहेत तब्बल ४९९ डॉलर म्हणजे जवळजवळ २२,५०० रुपये.आणि आठ गिगाबाईट क्षमतेच्या आयफोनची किंमत आहे ५९९ डॉलर. म्हणजे साधारणत:२७,००० रुपये.पोटात गोळा आणणा-या या किंमती असल्या, तरी भारतात आयफोन येईल तेव्हाच्या किंमती वेगळ्याही असू शकतील!किंमती कमी झाल्यास घ्यायला काहीच हरकत नाही असाच हा फोन आहे.मग? कधी करताय पैसे साठवायला सुरुवात?

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home