Saturday, April 28, 2007

एकत्र एक कि वेगवेगळे अनेक?

एन ९१ (किंवा त्यासारखाच एखादा high end भ्रमणध्वनी) = रु. २०,०००/-(जवळजवळ)

आता या किंमती पाहा,

डिजीटल कॅमेरा = रु. १०,०००/-
एमपी३ प्लेयर = रु. ४,०००/-
साधा फोन = रु. ३,०००/-
एकूण = रु.१७,०००/-
वरच्या यादीतल्या कोणकोणत्या गोष्टी तुमच्याकडे आहेत? नसलेल्यांपैकी कोणत्या गोष्टी आपणाजवळ असाव्यात असंतुम्हाला वाटतं?आज बाजारात अशा जवळ बाळगण्याजोग्या वस्तूंची नुसती झुंबड उडून राहिली आहे.आमच्या एका परिचितांचीच हकीकत तुम्हाला सांगतो.यांच्या चिरंजीवांना सॉफ्टवेअर उद्दोगात नोकरी लागली,यथावकाश पगार वाढला.एक चांगल्यापैकीभ्रमणध्वनी घेऊन झाला,त्याच्यानंतर एमपी३ प्लेयर आणि त्यानंतर उत्तम डिजीटल कॅमेरा-याची पण खरेदी झाली."अरे पण एकच महागडा आधुनिक फोन घेतला असतास तर हे सगळं एकत्र त्यात मिळालंच नसतं का?"या माझ्या प्रश्नाने मात्र तो जरा विचारात पडल्यासारखा दिसला.
तुम्हाला काय वाटतं?एकाच उपकरणात सगळ्या गोष्टी अंतर्भूत असाव्यात की सगळ्यांची वेगवेगळी खरेदी करावी? चला तर मग,आजच्या नॊंदीत या विषयावर चर्चा करुयात.
तसं पाहायला गेलं तर वेगवेगळी उपकरणं खरेदी केली तर काही हजारांची बचत होऊ शकते,हे वरच्या उदाहरणावरुन लक्षात येईल.शिवाय वेगवेगळी उपकरणं खरेदी करण्याचा हा एक मोठा फायदा आहे की ज्या हेतूने तुम्ही एखादं उपकरण खरेदी करता त्या हेतूला त्या उपकरणाद्वारे पूर्णपणे न्याय मिळू शकतो.कारण साहजिकच संबंधित उपकरण त्या हेतूसाठीच बनवलेलं असतं. थोडं स्पष्ट करुन सांगतो.जेव्हा तुम्ही एखादा ब-यापैकी डिजीटल कॅमेरा खरेदी करता त्यावेळी फोटोंबरोबरच चलतचित्रण (video shooting)घेण्याची सुविधासुध्दा तुम्हाला मिळते.मात्र एकतर या चलतचित्रणाचा दर्जा आपल्याला हवा तसा नसतो शिवाय ते खूपच थोडावेळ करता येतं.याउलट जेव्हा तुम्ही हॅंन्डीकॅम खरेदी करता तेव्हा चलतचित्रण ब-याचवेळ आणि उत्तम होतं मात्र छायाचित्र घेण्याची सोय मात्र केवळ नावापुरती राहते.
अर्थात या गोष्टीची दुसरी बाजूही तितकीच बरोबर आहे.या सगळ्य़ाच वस्तू वेगवेगळ्या घेतल्या तर एकाचवेळी त्या बरोबर बाळगणं शक्य होत नाही.मात्र महागड्या एकाच फोनमध्ये सगळी ऍप्लिकेशन्स असतील तर फोनबरोबरच तुम्हाला सर्व ठिकाणी त्यांचा आनंद लुटता येतो.कारण भ्रमणध्वनी आवश्यक असल्याने तो आपण जवळ बाळगतोच.याचा फायदा असा की भ्रमणध्वनीमध्येच कॅमेरा पण असल्याने अनपेक्षित घटनांचे फोटोपण काढता येतात शिवाय जर वाहतूक कोंडीमध्ये वगैरे तुम्ही अडकलाच तर एमपी३ प्लेयरवर गाणी ऐकता येतात.
दोन्ही बाजू मला तर तितक्याच बरोबर वाटतात.गेले बरेच दिवस मी विचार करतोय पण मला काय अजून या प्रश्नाचं उत्तर सापडलेलं नाही.तुम्हाला काय वाटतं?

Wednesday, April 25, 2007

वेळ धंद्याची आहे.

वेळ धंद्याची आहे.
पहिल्यापासूनच धंदा या प्रकाराबद्दल मराठीजनांचा दृष्टीकोन नापसंतीदर्शक राहिला आहे,त्याची कारणमीमांसा मी करत नाही.आज परिस्थिती वेगाने बदलत असली तरी अशा मराठीजनांची संख्या वाढायला हवी हे मात्र नक्की.
असो, आजची ही नोंद आहे आजकालच्या धंद्याच्या बदललेल्या परिमाणांचा विचार करण्य़ासाठी.लोकांच्या सुपीक डोक्यातून काय भन्नाट कल्पना निघतील आणि बघताबघता कशाचा धंदा ते सुरु करतील याचा अंदाज करणे खरेच अवघड आहे! जगातल्या वेगाने बदलत असलेल्या परिस्थितीमुळे आणि ते वेगाने जवळ येत असल्याने या संधी निर्माण झाल्या आहेत हे बाकी खरेच.
जास्त पाल्हाळ न लावता तुम्हाला काही उदाहरणंच दिली तर तुमच्या सहज लक्षात येईल.
आंतरजालातलं सेकंड लाईफ नावाचं दुसरं जग तुम्हाला माहित आहे का?असेलंच म्हणा!तर आपल्या या जगासारख्याच सगळ्या गोष्टी आपण तेथेही करु शकतो.या जगातल्या चलनाचं नाव आहे लिंडेन डॉलर. तर एक श्रीमती आपल्या ख-या डॉलरच्या बदल्यात हे चलन या दुसरया जगात विकतात आणि या द्वारे त्यांनी बराच पैसा कमावलाय.दुसरं उदाहरण आहे सिंगापुरमधल्या एका वृध्देचं.सिंगापूर खरेदीसाठी जगप्रसिध्द आहेच मात्र बर्याच जणांना सिंगापूरमध्ये गेल्यावर खरेदी कुठे करावी,कोणत्या वस्तू कुठे चांगल्या मिळतात हे माहित नसतं.अशा भटक्यांना सल्ला पुरवण्याचं काम या वृध्देचं.पण त्यासाठी तुम्हाला मोजावे लागतात तब्बल १०० डॉलर दर तासाला!मात्र सिंगापूरमध्येच राहत असल्याने तिच्याकडून सिंगापूरची खडानखडा माहिती तुम्हाला मिळते.आहे की नाही कमाल?
धंदा करायची अशी एखादी कल्पना सुचली तर अजून काय पाहिजे?नोकरीनंतर निवृत्त होऊन घरी बसलेल्यांनाही फावल्या वेळेत खूप काही करता येईल.नुकतंच पेपरात एका महिलेबद्दल वाचलं की फावल्या वेळेत तिने फुलांच्या सजावटीचा कोर्स केला आणि आता तिने कृत्रिम फुलांच्या रचनांची लायब्ररी सुरु केली आहे.बॅंका,ऑफिसेस इ.ठिकाणच्या फुलांच्या रचना नियमित कालावधीनंतर बदलायच्या आणि नवीन मांडायच्या एवढंच काम.मात्र त्यासाठी अशा एखादी कल्पना स्फुरायला हवी हे महत्त्वाचं!
असा जरा वेगळा विचार तुम्ही कधी करता का? नाहीतरी नोकरी,दैनंदिन जीवन हे तर आहेच की!जरा यातनं बाहेरचा विचार करुन तर बघा.काय सांगावं तुम्हालाही एखादी कल्पना सुचेल! अन मग,आपलं आवडतं काम केल्याचं समाधान नि भरपूर पैसा हे दोन्ही तुमचंच ! काय म्हणता?

Sunday, April 22, 2007

सुधारक जालनिशीतली पहिली नोंद

सुधारक जालनिशीतली पहिली नोंद
मुकुंदराज यांनी लिहिलेला 'विवेकसिंधु' हा मराठी भाषेतील पहिला ग्रंथ,त्याला आता अनेक शतके होऊन गेली. १८१७ मधे इंग्रजीतून पहिलं मराठी पुस्तक भाषांतरित केलं गेलं.
त्यानंतर १८३२ मधे बाळशास्त्री जांभेकरांनी 'दर्पण' हे मराठीतलं पहिलं वृत्तपत्र काढलं आणि मराठी भाषेतल्या एका नव्या अध्यायाला प्रारंभ झाला. मराठी वाचकांना जागरूक, बहुश्रुत, प्रगल्भ करण्याचं नि त्यांच्यावर घडत असलेल्या अन्यायाचं आणि वास्तवाचं भान आणून देण्याचं काम वृत्तपत्रे तेव्हापासून आत्तापर्यंत करत आलेली आहेत नि यापुढेही करतील. एवढ्या वर्षांच्या काळात कित्येक वृत्तपत्रं आली,चालली,वाढली आणि काही बंदही पडली.आंतरजालाच्या जमान्यात वृत्तपत्रांच्या ई-आवृत्त्या निघायला लागल्या,काळाप्रमाणे त्यांनाही बदलावं लागलं.वळणावळणाने चाललेला हा प्रवास खरंच आश्चर्यचकित करुन सोडणारा आहे.
आणि आता जालनिशी (ब्लॉग).सर्वसामान्य माणसालाही मनाचं अंतरंग व्यक्त करायला लावणारं एक नवीन माध्यम.इंटरनेटच्या अनेक देणग्यांपैकी एक. इंग्रजी भाषेत आले त्याप्रमाणे अनेक जालनिश्या मराठीतही आल्या.त्यांची संख्याही वाढली.पण इंग्रजी किंवा अगदी हिंदी भाषेत जशा जीवनाच्या सगळ्या बाबींना स्पर्श करणा-या, आजुबाजुच्या विविध घटनांवर भाष्य करणा-या आणि वाचतावाचता विचार करण्यास प्रवृत्त करणा-या जालनिश्या आहेत, तशा जालनिश्यांची मराठीत नक्कीच वानवा आहे. आज ही 'सुधारक' जालनिशी सुरु करताना असंच काही वेगळं करण्याचा आमचा विचार आहे.
कुठल्याही एका खास विषयासाठी ही जालनिशी मर्यादित असणार नसुन, सगळ्याच विषयांना स्पर्श करणारं लिखाण या जालनिशीवर वाचता येईल.वेगळा विचार मांडणारं, नवीन काहीतरी करायला प्रेरणा देणारं,प्रवृत्त करणारं लिखाण द्यायचा आमचा मानस आहे. जगाला दुर्लक्षून आज कुणालाही पुढे जाता येणार नाही मात्र याच वेळी आपल्या शहराला टाळूनही जमणार नाही. एकाचवेळी पुण्यापासून पॅरिसपर्यंत आणि महाराष्टातल्या राजकारणापासून महाजालावर येत असलेल्या तंत्रज्ञानापर्यंत अनेक विषयांवर टिप्पणी करणारी ही जालनिशी असेल, यात तुम्हा वाचकांची साथ मात्र आम्हाला अतिशय महत्वाची वाटते, ती मिळेल ना?