Sunday, May 20, 2007

वाढता वाढता वाढे...

महागाई, लोकांच्या अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न.या वाढणा-या महागाईबद्दल सततच ओरड होताना दिसते.मोर्चे,आंदोलनं सतत काहीना काही तरी चालू असतंच आणि ते साहजिकच आहे म्हणा.रोजच्या खर्चाचा ताळमेळ बसवताना या महागाईमुळे सामान्यजन अगदी जिकिरीला आलेले दिसतात.सध्याचं आपलं संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकारच घ्या!चलनवाढ आटोक्यात आणा,महागाई कमी करा यासाठी त्यांच्यावर हरप्रकारे दबाव आणला जात आहे,मात्र कितीही प्रयत्न केले तरी महागाई आपली चाललीच आहे पुढे न पुढे!खरंच ही महागाई इतकी का वाढत आहे?मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर आर्थिक विकासाच्या दरात आहे.आर्थिक विकासाचा चढता दर आणि महागाई हे दोघं,जुळ्या भावंडांप्रंमाणे एकमेकांशी निगडित आहेत.आर्थिक विकासामुळे साहजिकच काही लोकांना विकासाच्या जास्त संधी उपलब्ध होतात,जास्त संधींमुळे येणारा जास्त पैसा जीवनमानाचा उंचावलेला स्तर घेऊन येतो.एकदा का अशा राहणीची सवय लागली की अशा लोकांचा गट बाजारात उपलब्ध असलेल्या वस्तूंसाठी प्रसंगी जास्त पैसा मोजायला तयार असतो.जास्त पैसा खर्च करणं त्यांना परवडतं.साहजिकच मालाचा विक्रेता मालाचा भाव वाढवून अजून नफा कमवू इच्छितो.केवळ काही लोकांना परवडतं म्हणून वस्तूंचे भाव वाढतात.इथेच 'ज्यांना परवडतं त्यांनी घ्यावं,ज्यांना परवडत नाही त्यांनी गप्प बसावं'अशी व्यापा-यांची भूमिका तयार होत जाते.यादृष्टीने विचार करता पुण्यातल्या आयटी कर्मचा-यांमुळे सदनिकांचे भाव गगनाला कसे भिडले हे उदाहरण उपयुक्त ठरेल.आयटी कर्मचा-यांना मिळणारे भरघोस पगार म्हणजे सोन्याची कोंबडीच.पगाराद्वारे एवढं उत्पन्न मिळवून देणारं बहुधा दुसरं कोणतंच क्षेत्र नसावं.शिवाय हे क्षेत्र जोमाने विस्तारत असल्याने पुण्यात बाहेरील प्रांतातून येणारे तसे पुष्कळजण आहेत. भरपूर पगारामुळे बॅंकांकडून कर्ज मिळवणे आणि नंतर महिन्याला ठराविक हप्ता भरणे त्यांना सहज शक्य असते,यामुळेच पुण्यात आता सदनिका विकत घेणं सामान्यांना जवळजवळ अशक्यच झालं आहे.महागाई आटोक्यात आणण्यासाठी उपाय असले तरी ते राबवणे ही अवघडच आहे.पहिलं म्हणजे लोकांचं वेतन मर्यादेत ठेवणं.मात्र अनेक परदेशी कंपन्या भरघोस वेतन देत असताना असा निर्णय अवघडच आहे.आणि मर्यादा आणलीच तर मग आपल्या लोकशाहीत आणि साम्यवादात काय फरक राहिला? शिवाय वेतनावरील मर्यादेमुळे जर मनुष्यबळाने बाहेरील देशांचा रस्ता पकडला तर आणखी काय करणार?त्यासाठी परत काही वर्षे देशातच नोकरी करण्याची अट घाला काय? एकूणच एका प्रश्नातून दुसरे प्रश्न निर्माण होत जाणार!म्हणूनच महागाई वाढली तरी जीवनावश्यक वस्तू गरिबांना रास्त दरात मिळतील याची काळजी सरकारने घ्यायला हवी.त्यासाठी स्वस्त धान्य दुकानांची यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज आहे.शिवाय गहू,तांदूळ,साखर,रॉकेल यांबरोबरच आणखी काही वस्तूंना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत स्थान मिळायला हवं.केवळ रेशनिंगमधला काळा बाजार रोखला तरी महागाईची झळ कमी होण्यास हातभार लागणार आहे.आर्थिक विकास होत असतानाच तो सर्वांपर्यंत पोहोचण्याची काळजी घेणं सरकारची जबाबदारी आहे.येणा-या नव्या भारतात प्रत्येकासाठी काहीना काही तरी असायलाच हवं!नाहीतर हा पदोपदी दिसणारा विरोधाभास येत्या काळातही जाणवणार असेल,तर जागतिक महासत्तेचं आपलं उद्दिष्ट स्पष्ट व्हायला जास्त वर्षं लागतील हे निश्चित!

Wednesday, May 2, 2007

'यु ट्युब' बद्दल थोडेसे...

अल्पावधीतच तुफान प्रसिध्दी मिळवलेले 'यु ट्युब'हे एक केवळ चलतचित्रणाला वाहिलेलं संकेतस्थळ आहे.आपण स्वत: केलेलं चलतचित्रण(videos) या संकेतस्थळाद्वारे इतरांपर्यंत पोहचवू शकता,इतरांचे video पाहू शकता,ते स्वत:च्या संगणकावर डाऊनलोड करु शकता एवढंच नाहीतर त्या videos ना तुमचा आवडक्रमदेखील देऊ शकता.
पे पाल या कंपनीच्या तीन भूतपूर्व कर्मचा-यांनी फेब्रुवारी २००५ मध्ये यु ट्युबची स्थापना केली.स्थापना केल्यापासून लगेचच हे संकेतस्थळ प्रसिध्दीच्या झोतात आले आहे.लोकांद्वारेच झालेली प्रसिध्दी हे त्यामागचं प्रमुख कारण आहे.विविध प्रकारच्या चलतचित्रणाचा या संकेतस्थळावर खजिनाच आहे. टी.व्ही.वरच्या मालिका, चित्रपटांमधली दृश्यं,दृक-गाणी तर आहेतच शिवाय होतकरुंनी काढलेले छोटे चित्रपट ,तुमच्या आमच्या सारख्यांनी केलेलं चित्रणही उपलब्ध आहे.
जरी तुम्ही यु ट्युबचे सदस्य नसलात तरी काही बिघडत नाही.सदस्य नसलेल्यांनाही बरेचसे videos बघता येतात.मात्र सदस्यत्व असलं तर उत्तमच.कारण त्याद्वारे तुम्ही काही विशेष videos तर बघू शकताच शिवाय ते डाऊनलोड करण्याची देखील तुम्हांला परवानगी मिळते.videosला तुम्ही तुमची प्रतिक्रियासुध्दा देऊ शकता.तुमच्या आवडीच्या कलाकाराचे videos पाहण्यासाठी तुम्ही subscribe देखील होऊ शकता.
अमेरिकेच्या स्वामित्व हक्क कायद्यानुसार अधिकृत असलेलं साहित्यच या संकेतस्थळावर डाऊनलोड करता येतं.तरीही अनधिकृत असं बरंच साहित्य या संकेतस्थळवर येतच असतं.असलं हे कायद्याचा भंग करणारं साहित्य काढून टाकण्याचंमोठं काम 'यु ट्युब' ला सतत करावं लागतं.ब-याचदा अशा साहित्याच्या मालकाला कळण्य़ाआधीच स्वयंसेवकांच्या सहाय्याने हे साहित्य काढून सुध्दा झालेलं असतं.
मात्र या संकेतस्थळासाठी सगळंच काही आलबेल नाहीये.अनधिकृतपणे प्रसिध्द होणा-या साहित्याच्या मालकांची या संकेतस्थळावर सतत आगपाखड चालू असते.एवढंच करुन ते थांबलेले नाहीत तर 'यु ट्युब' ची लिंक देणा-या त्रयस्थ संकेतस्थळांनाही त्यांनी धारेवर धरायला सुरुवात केली आहे.ब-याच प्रकरणांच्या बाबतीत त्यांनी 'यु ट्युब'ला न्यायालयात खेचलं आहे.याशिवाय सांगायचंच झालं तर ब-याचवेळा 'यु ट्युब'ला अनेक देशात बंदीला देखील सामोरं जावं लागलं आहे.टर्की,इराण,थायलंड हि त्यातली काही नावं.आक्षेपार्ह साहित्य मुलांनी पाहू नये म्हणून खुद्द अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामधल्या काही शाळांनीही 'यु ट्युब'वर बंदी घातली होती.मात्र आपल्या ६७ कर्मचा-यांच्या सहाय्याने 'यु ट्युब'चा कारभार अव्याहतपणे चालू आहेच.
केवळ एका वर्षाच्या कालावधीतच'यु ट्युब'ने 'Invention of the year'हा प्रसिध्द 'टाईम' मासिकाकडून देण्यात येणारा पुरस्कार साल २००६ साठी मिळवला आहे. ऑक्टोबर२००६ मध्ये'गुगल'ने'यु ट्युब' विकत घेत असल्याची घोषणा केली.स्वामित्व हक्क कायद्यातून सुटण्यासाठी यु ट्युब कडून तीन प्रस्ताव सादर केले गेले.त्यानुसार १६५ कॊटी या किंमतीला 'यु ट्युब' 'गुगल' परिवारात सामिल झालं.मात्र यु ट्युब पूर्वीप्रमाणेच वेगळं राहून काम करेल असा निर्णय घेण्यात आला.
'यु ट्युब'मुळे कित्येक जणांना प्रसिध्दीचा लाभ झालाय हे सांगायचं म्हंटलं तर एक भलीमोठी यादीच द्यावी लागेल.अनेकांना आपले कौशल्यपूर्ण परंतु दुर्लक्षित videos केवळ यु ट्युब मुळेच इतरांपर्यंत पोहोचवता आले आणि प्रसिध्दीच्या झोतात येता आलं.म्युझिक विडीओज बनवणा-यांना 'यु ट्युब'मुळे तात्काळ प्रसिध्दी मिळते.काही जणांनी आपल्या संकेतस्थळाच्या नावात 'ट्युब'या अक्षरांचा वापर करुन प्रसिध्दी मिळवण्याचा प्रयत्न चालवला आहे.त्यांना ती मिळो अथवा ना मिळो.'यु ट्युब'ची ख्याती वाढत जाणार हे नक्की.अजून तुम्ही या संकेतस्थळाला भेट दिली नसेल तर जरुर द्या.एखादा video सुध्दा(त्या दर्जाचा असेल तर!!) पाठवायला हरकत नाही बरं का!